72 तासांत कापले सायकलवर एक हजार किमीचे अंतर

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे विजय फिरके यांची यशस्वी कामगिरी : रनर्स ग्रुपने केला सन्मान


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके यांनी बडोदा सायकल क्लब आयोजित एक हजार किमी सायकलिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केले. 28 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता बडोदा येथील मल्हार पॉईंट येथून स्पर्धेला सुरुवात झाली. कच्छ जिल्ह्यातील डोलाविरा व तेथून त्याचमार्गे परत बडोदा असा स्पर्धेचा मार्ग होता. त्यासाठी 75 तासांचा अवधी दिला होता. मात्र, फिरके यांनी 72 तासांत स्पर्धा पूर्ण केली.

जिद्दीने केली स्पर्धा पूर्ण
विजय फिरके हे भुसावळहून एकटेच स्पर्धक असल्याने त्यांनी अतिशय निर्धाराने व जिद्दीने एकाकीपणे ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने 25 हून जास्त पूल असल्याने प्रचंड चढ-उताराचा सामना करावा लागला. त्यातही कित्येक किमीचा रस्ता आदिवासीबहुल भागातून जाणारा व निर्जन होता. त्यामुळे त्यांनी स्वतः खाण्यापिण्याचे सामान सोबत ठेवत सायकलिंग केले. शिवाय एकदा सायकल पंक्चर झाल्यामुळे व स्पर्धेच्या नियमानुसार कुठलीही बाहेरील मदत घेता येत नसल्याने त्यांनी स्वतः सायकल दुरुस्त केली. या संपूर्ण तीन दिवसांच्या प्रवासात त्यांनी केवळ पाच तास झोप घेतली. भुसावळात रेल्वे स्टेशनवर विजय फिरके यांचे सूर्य कन्या तापी नदी ग्रुपतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी नीळकंठ भारंबे, किरण वाणी, दिनेश राणे, बाबूराव नागरे, संजय महाजन, योगेश ओसवाल, नरेंद्र भोळे, चंदू पाटील, काशीनाथ पाटील, पंकज पाटील उपस्थित होते.

एकूण 34 स्पर्धक
स्पर्धेमध्ये एकूण 34 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. पैकी तीन महिला होत्या. यापैकी केवळ 18 स्पर्धक अवघड स्पर्धा पूर्ण करू शकले. सहभागी सायकलपटूंमध्ये सर्व जणांचे सरासरी वय 40 वर्षे होते. परंतु 56 वर्षीय विजय फिरके यांनी वयाची कुठेही आडकाठी नसते असे सिद्ध केले. बहुतांश स्पर्धक सांघिकरीत्या सोबत सायकलिंग करत होते.

रनर्स ग्रुपतर्फे स्वागत
डी.एस.ग्राउंड येथे भुसावळ रनर्सतर्फे फिरके यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.चारुलता पाटील, आरती चौधरी, आराधना तांबे, रुपा अग्रवाल, सारिका पाटील, श्रीकांत नगरनाईक, सचिन मनवानी, कैलास छाब्रा, श्रीकांत जोशी, राजेंद्र ठाकूर, अखिलेश कनोजिया, महेंद्र पाटील, डॉ. उमाकांत चौधरी, संजय भदाणे, तरुण बीरिया, अशोक पाटील, रंजित खरारे, प्रमोद शुक्ला, अजय पाटील, सारंग चौधरी, अभिजित शिंदे, प्रवीण वारके, रमेशसिंग पाटील, प्रवीण पाटील हे धावपटू उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !