राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार !
पुणे : नियोजित वेळापत्रकानुसार राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा ऑफलाईनच (exam offline) होणार असल्याची घोषणा गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? यावरून संभ्रमाचे वातावरण असतांना आज राज्य शिक्षण मंडळाने दोन्ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (sharad gosavi) यांनी ही माहिती दिली आहे.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार परीक्षा
गोसावी म्हणाले की, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल. गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थी त्यांच्या शाळेतच पेपर देऊ शकतील. या संदर्भात आम्ही मुख्याध्यापक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली आहे. अपरीहार्य कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा एखादा पेपर देता येत नसेल तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. तसेच, लेखी परीक्षेत 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे तर 70, 80 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक दिला जाणार आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

बारावी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होणार
इयत्ता बारावीची परीक्षा (12th exam) 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा (10th exam) 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून 2022 च्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात जाहीर होईल.
दहावी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होणार
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा 5 एप्रिल ते 19 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै 2022 च्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात जाहीर होईल.
