यावलमधील अवैध सावकाराने बळकावलेले साहित्य मूळ तक्रारदाराला परत


यावल : शहरातील तरुणाविरुद्ध अवैध सावकारीसह खंडणी उकळून घरातील साहित्य उचलून नेल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तरूणाला अटक करून पोलिसांनी साहित्य हस्तगत केले होते. हे साहित्य शुक्रवारी मूळ फिर्यादीला परत करण्यात आले. गुन्हा दाखल करून अवघ्या 23 दिवसातच फिर्यादीला साहित्य परत केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

यावलमधील अवैध सावकाराने बळकावलेले साहित्य मूळ तक्रारदाराला परत
दहिगाव येथील गुलाब कडू मिस्तरी-रुले यांनी 12 जानेवारी रोजी यावल पोलिसांत तक्रार दिली होती. त्यात यावल येथील सुमित युवराज घारु याच्याकडून मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी दीड वर्षांपूर्वी 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या पैशांच्या मोबदल्यात घारूला एकूण एक लाख 35 हजार रुपये व्याजासह परत केले. तरीदेखील घारूने पूर्ण पैसे मिळाले नाही, असे सांगत फिर्यादीच्या घरातून एलईडी टीव्ही, मोबाईल, होम थिएटर, फ्रिज अशा वस्तू उचलून नेल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घारूला अटक करीत सर्व साहित्य हस्तगत केले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत शुक्रवारी रात्री यावल पोलिसांनी हे साहित्य फिर्यादीला परत सोपवण्यात आले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, एपीआय अजमल खान पठाण, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी केला.

पोलिसांचे आवाहन
अवैध सावकारी प्रकरणांमध्ये कोणीही स्टॅम्प लिहून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करत असेल तर नागरीकांनी यावल पोलिसांत तक्रार करावी. पोलिस नियमानुसार कारवाई करतील, असे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !