चार हजारांची लाच भोवली : पोलिस कर्मचारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळे : चार हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचार्याला धुळे एसीबीच्या पथकाने अटक केली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शेतकर्याचा चोरीस गेलेला कापूस खरेदी केल्याच्या वादात लाच घेतांना ही कारवाई करण्यात आली. शशिकांत कोळी असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
धुळे एसीबीचा सापळा यशस्वी
बेटावद येथील शेतकर्याचा कापूस शेतातून चोरी गेला होता. याबाबत त्यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावर पोलिसांकडून कारवाई झाली. तसेच समझोता करण्यात आला. या समझोता प्रकरणी आरोप असलेल्या व्यक्तीच्या नातलगांकडून पोलिस कर्मचारी शशिकांत जगन्नाथ कोळी (42) चार हजार रुपयांची मागणी करत होते. याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पुरेशी पडताळणी केल्यानंतर बेटावद गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा लावण्यात आला. त्यानंतर शशिकांत कोळी यास चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आरोपी पोलिस कर्मचार्यास 5 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


