रीक्षा युनियन अध्यक्षाची निर्घृण हत्या


नालासोपारा : नालासोपारा रीक्षा युनियनचे शहराध्यक्ष विनोदकुमार सिंग यांची टोळक्याने किरकोळ कारणावरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

सिगारेट मागण्यावरून राडा
नालासोपार्‍याच्या तुळिंज रोडवरील राधानगरमधील हरिप्रसाद बिल्डिंगमध्ये विनोदकुमार सिंग परिवारासह राहत होते. ते रीक्षा चालक-मालक संघटनेचे नालासोपारा शहर अध्यक्ष होते. त्यांचे बोईसर येथील वारांगडे गावात दुध डेअरी आणि किराणा सामानाचे दुकान आहे. रविवारी रात्री त्यांचा मुलगा सत्येंद्रप्रसाद (20), ते आणि त्यांचा भाऊ आनंदकुमार हे दुकान बंद करून जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास गावातील 7 ते 8 आरोपी दुकानासमोर येऊन सिगारेटची मागणी केली. विनोदकुमार यांनी दुकान बंद झाले असून सिगारेट मिळणार नाही, असे सांगितल्यावर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेले. काही वेळाने आरोपी हातात लाठीकाठी, सळई, दगड घेऊन येत सिगारेट न दिल्याच्या रागातून तिघांवर जीवघेणा हल्ला केला. एका आरोपीने दुकानाची तोडफोड करताना तुटलेल्या काचेचा तुकडा हातात घेऊन गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. घटनेनंतर गंभीर जखमी विनोद यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, पण तब्येतीमध्ये सुधारणा होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर बोईसर येथून नालासोपार्‍याच्या स्टार हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आणण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सोमवारी सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा व भावालाही नालासोपार्‍यात उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !