बसमध्ये चढताना महिलेचे दागिने लंपास
जळगाव : जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेचे रोकडसह दागिणेे मिळून 76 हजारांचा मुद्देमाल लांबविला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
76 हजारांच्या ऐवजावर डल्ला
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी सोजरबाई चतरसिंग राजपूत (59) या सोमवारी कामानिमित्ताने जळगावात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा गावी जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकात आल्या. या ठिकाणी जामनेरकडे जाणार्या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 38 ग्रॅमच्या सोन्याच्या दोन पोत तसेच पाच हजार रुपये रोख असा 76 हजारांचा ऐवज कुणीतरी चोरून नेला. बसमध्ये बसल्यानंतर आपले दागिणे तसेच पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोजरबाई राजपूत यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.


