वर्षभरापूर्वीच लग्न ; शेततळ्यात बुडाल्याने नवदाम्पत्याचा मृत्यू
कोपरगाव : वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या पती-पत्नीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. पूजा नीलेश शिंदे (23), नीलेश रावसाहेब शिंदे (26) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
पतीला वाचवताना पत्नीही बुडाली
वीजपुरवठा सुरू नसल्याने पूजा व तिचा पती नीलेश हे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. याच दरम्यान पाणी भरताना पाय घसरून नीलेश शेततळ्यात पडला. त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी पूजाने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी बुधवारी (दि.9) दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नीलेश हा उच्चशिक्षित होता व वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंचलगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

