मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सव होणार : हभप रवींद्र हरणे महाराज यांची माहिती
मुक्ताईनगर : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सवात खंड पडला असलातरी यंदा मात्र नियमांचे पालन करून यंदा यात्रोत्सव कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याची माहिती संत मुक्ताई संस्थान पालखी सोहळाप्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज यांनी दिली दिली आहे.
गुरू-शिष्य परंपरेची यात्रा
माघ महिन्यामध्ये परंपरेने जी यात्रा भरते, ती संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंची यात्रा असते. या यात्रेचे असे वैशिष्ट्य आहे की, चांगदेव आणि मुक्ताबाई अशी गुरू शिष्याच्या परंपरेची भली मोठी भावनिक यात्रा आहे. माघ वद्य महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांनी पुणतांब्याला समाधी घेतली आणि चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ही वारी असते. त्यामुळे चांगदेव वारीला आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका पालखी चांगदेव भेटीला महाशिवरात्रीला निघत असल्याने गुरू-शिष्यांची भेट या माध्यमातून होते. त्यातच विदर्भ मराठा वाडा, खान्देश आणि मध्यप्रदेश या भागातून शेकडो दिंड्या लांबून मुक्ताई चांगदेव वारीला येतात. या पारंपरीक वारीला कोरोना महामारीमुळे खंड पडला होता मात्र यंदा हजारो भाविकांना यात्रेची प्रचंड आस लागली आहे. दोन वर्षांपासून मुक्ताई यात्रोत्सवा पासून वंचित असलेल्या शेकडो दिंड्या व या माध्यमातून दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांना यंदाच्या मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सवाची व मुक्ताईच्या दर्शनाची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. यंदा जरी शासनाचे निर्बंध असले तरी भाविकांचे ध्यान मुक्ताईच्या दर्शनाच्या ओढीने व्याकुळ झालेले आहे. दरम्यान, यात्रोत्सव होणार असल्याने तीर्थक्षेत्र मुक्ताई संस्थानने देखील यात्रेची तयारी केली आहे.
आमदारांच्या प्रशासनाला सूचना
यंदा दोन वर्षांच्या कालखंडानंतर माघवारी यात्रोत्सव भरणार असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, अनिकेत वाडे, हभप रवींद्र हरणे महाराज, हभप उद्धव महाराज, मुक्ताईनगरचे नगरसेवक तसेच चांगदेव, कोथळी, मेहुण येथील सरपंच, ग्रामसेवक, मंदिर समितीचे सदस्य आदींची गेल्या आठवड्यात बैठक घेऊन यात्रोत्सवा संबंधी आढावा घेतला व यानुसार जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासनाच्या गाईडलाईन नुसार यात्रोत्सव साजरा करण्याचे बैठकित चर्चा करण्यात आली.


