यावलमध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत पार पाडला आदर्श विवाह
यावल : अनावश्यक खर्चाला फाटा देत शहरातील मुस्लिम समाजात केवळ जलपानाच्या आदर तिथ्यावर निकाह (विवाह) लावण्यात आला. रूढी, परंपरेला फाटा देत पार पडलेल्या या विवाहाचे समाजातून कौतुक होत आहे. या विवाह सोहळयात विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक
शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी समसुद्दीन शेख सफीयोद्यीन यांचा मुलगा अजहर शेख यांचा विवाह शहरातीलचं बाबूजीपुरा भागातील रहिवासी युसूफ खान इस्माईल खान यांची कन्या फरहिन जहाँ यांच्यासोबत निश्चित झाला मात्र हा विवाह अत्यंत साध्या पद्धत्तीने करण्याचा निर्णय वर मंडळीकडून घेण्यात आला. वधूकडून मुस्लिम समाजानुसार गृहोपयोगी साहित्य दिले जाते तसेच हळद व विवाहप्रसंगी पाहुणचार केला जातो मात्र या रूढी, परंपरेला फाटा देत आदर्श विवाह व्हावा म्हणून सोमवारी शहरात केवळ जलपान करून आदरातिथ्य करीत हा विवाह लावण्यात आला. निकाह पढण मौलाना सैय्यद समी बाबा कादरी यांनी केले व उपस्थितांना खजूर वितरण करून चहा तसेच शरबत वितरण करण्यात आले.
यांनी उपस्थित राहून दिले आशीर्वाद
शहरात अशा या आदर्श विवाहासाठी आमदार शिरीष चौधरी, जळगावचे माजी महापौर हाजी करीम सालार, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा परीषदेचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, मुफ्ती हारून, पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, धनंजय चौधरी, कदीर खान, अनिल जंजाळे, नईम शेख, विक्की गरजेसह अनेकांची उपस्थिती होती.


