भुसावळात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज कोट्यवधींच्या विकासकामांचे उद्घाटन
भुसावळ : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता शहरात सहा कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे. शहरातील जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळ होणार्या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या विकासकामांचे होणार उद्घाटन
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत चार कोटी 37 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे. त्यात भुसावळातील म्युन्सीपल हॉस्पीटल ते लोखंडी पुलापर्यंत आरसीसी रोड गटार बनवणे, बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी नाल्यापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवणे, भुसावळ नगरपालिका हद्दीतील नाहाटा चौफुली, श्रीराम डेअरीपासून ते मोटूमल शोभराज चौकापर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक टाकणे तसेच सुशोभीकरण करणे, यावल रोडवरील गांधी पुतळा ते जॉली पेट्रोल पंपापर्यंत सुशोभीकरण करणे, गांधी पुतळा ते राहुल नगरापर्यंत दुभाजक तयार करणे, प्रभाग क्रमांक 19 मध्ये केळकर हॉस्पीटलमागील ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करणे, प्रभाग सातमधील तुषार चिरमाडे यांच्या घरापासून बाळू शिरोळे, अष्टविनायक कॉलनी आदी ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत भुसावळ नगरपालिका संचलित दयाराम शिवराम विद्यालयाचे नूतनीकरण, स्टाफ व विद्यार्थ्यांसाठी 20 सीटचे बांधकाम तसेच याच विद्यालयाच्या इमारतीला खिडक्या, ग्रील, दरवाजे, फ्लोरींग, पत्रे, रंगकामे करणे तसेच पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरण व दुरुस्ती व प्लास्टर, सर्वे क्रमांक 53/4 अ मधील खुल्या जागेत बगीचा विकसीत करणे तसेच नगरपालिका संचलित शाळा क्रमांक एकचे नुतनीकरण व कम्पाउंड वॉल, इमारत प्लास्टर प्रुफिंग व रंगकाम करणे या कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.


