एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्याचे पडसाद : सेंसेक्स कोसळला
मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच 1500 हून अधिक अंकांनी कोसळला. जागतिक घडामोडी, रेकॉर्डब्रेक महागाई आणि नुकत्याच उघडकीस आलेल्या 23 हजार कोटी रुपयांच्या एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्याचे पडसाद आज शेअर बाजारामध्ये स्पष्टपणे दिसून आले. दरम्यान, सकाळी साडे अकरा वाजता तो 1172 अंकांनी खाली 56980 वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली. निफ्टी 402 अंकांनी कोसळला होता. त्यानंतर तो 355 अंकांनी खाली 17 हजार 19 वर ट्रेड करत होता.
या क्षेत्रात घसरण
बँक, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 2.50 टक्क्यांपासून 3 टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून येत आहे. तर मेटल इंडेक्समध्ये 3.50 टक्क्यांनी घट झाली आहे. आज सेंसेक्सच्या टॉप 30 मध्ये केवळ टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये तेजीत आहे. बाकी 29 शेअरवर लाल निशाण दिसत आहे. एसबीआय, टाटा स्टील आणि एचडीएफसीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसत आहे.



