तरूणाची गळफास घेवून आत्महत्या : विदगाव शिवारातील घटना
जळगाव : 31 वर्षीय तरुणाने गळफास (Hanging) घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील विदगाव शिवारातील शेतात बुधवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जगदीश रूबजी बारेला (31, रा. विरवाडे, ता.चोपडा) (jagdish rubaji barela) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शेतात केली आत्महत्या
जगदीश बारेला (jagdish rubaji barela) हा आई, भाऊ आणि मुलगीसह विरवाडे येथे वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. जगदीश बारेला याला दारूचे व्यसन जडले होते. शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असतांना घराच्या ओट्यावरून खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या दुखापतीमुळे त्याचा प्रचंड त्रास होत होता. दरम्यान, मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जगदीश बारेला याचा भाऊ जगन बारेला याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रीक्षाने घरी नेण्यासाठी निघाले. ममुराबाद रोडने रीक्षाने जात असतांना विदगावजवळ जगदीशने रीक्षातून उडी घेवून बाजूच्या शेतात पळ काढला. शोधाशोध करूनही तो कुठेही आढळून आला नाही. बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी विदगाव शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ नितीन सपकाळे यांच्या शेतातील झाडाला हात रूमालाने जगदीश बारेला (jagdish rubaji barela) याने गळफास (Hanging) घेतल्याचे बुधवारी सकाळी 9 वाजता उघडकीला आले.





जळगाव तालुका पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण कासार (Psi Kalyan Kasar) , सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर कोळी, जयेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
