एकाच गाडीवर जाणार्या चौघा भावंडांचा वाहनाला अपघात : दोघे ठार
पिंप्रीराजा : लग्न समारंभासाठी एकाच गाडीवर जाणार्या 4 भावंडाचा अपघात होवून त्यात दोघे ठार झाले तर दोघे जखमी झाले. आडगावकडून पिंप्रीराजाकडे येणार्या रस्त्यावर सोमवारी हा अपघात घडला. अनियंत्रीत बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रक ट्रेलरला धडकल्याने हा अपघात झाला. अर्जुन बबन ठोंबरे व पवन राजेंद्र ठोंबरे अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा गोविंद ठोंबरे व आशुतोष अर्जुन ठोंबरे हे दोन तरुण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
एकाच बाईकवरून जाताना अपघात
आडगाव येथील ठोंबरे कुटुंबातील चार युवक सोमवारी सायंकाळी एकाच बाईकवरून (एम.एच.19 ए.जे.6862) विवाह समारंभासाठी जात असताना गावापासून थोड्या अंतरावर पिंप्रीराजा रोडवर ट्रेलर (एम.एच.04 ई.वाय. 2307) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने बाईक थेट ट्रकच्या पाठीमागील भागात घुसली. या भीषण अपघातात बाईकवरील चारही जणांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी विदारक चित्र होते.

अपघातानंतर ग्रामस्थांची धाव
अपघातग्रस्त वाहन पाहताच ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य केले. गंभीर जखमी चौघांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून अर्जुन व पवन यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी कृष्णा व आशुतोष यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांवर मंगळवारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन तरुण मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती. दरम्यान, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणार्या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
