पालकमंत्र्यांचा खडसेंना टोला ; …तर चारीमुंड्या चीत केले नाही तर नाव बदलवून ठेवा !
नशिराबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री खडसेंसह महाजनांवर टिकेचे बाण चालवत खडसेंचा डाकू असा उल्लेख केल्यानंतर खडसेंनी त्यास प्रतिउत्तर देत ‘चोरांना सर्व चोर’ नजरेस पडतात, असा टोला हाणला होता. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचा नामोल्लेख टाळत पुन्हा त्यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. नशिराबाद येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ‘काही राजकीय लोक माझ्याविषयी इथं येऊन बरेच काही बोलून गेले. खरं सांगायचं झालं तर ते लपून लढाई करतात. हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा, नाही चारीमुंड्या चीत केले तर नाव बदलवून ठेवा’ अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नाव न घेता चिमटा घेतला.
त्यांना अजूनही मुख्यमंत्री होण्याची आस
नशिराबाद येथे अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ व शिवसह्याद्री प्रतिष्ठानने शिवजयंतीच्या निमित्ताने रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘मी मुख्यमंत्री झालो नाही एव्हढेच सातत्याने बोलत राहायचे आणि स्वत:च्या पुढे-मागे दोन गाड्या फिरवायच्या एवढेच काम काही लोकांना राहिले आहे. अजूनही त्यांची मुख्यमंत्रिपदाची आस गेलेली नाही’, अशी बोचरी टीका पालकमंत्र्यांनी खडसेंचे नाव न घेता केली.


बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून होतेय टिका
आमच्या वडिलोपार्जित कोणीच राजकारणात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी शिवसेना आली व त्यात मी सहभागी झालो. आमदार, खासदार, मुख्यमंत्री शिवसेनेचे होणार असा स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, आज चित्र बदलले आहे. जिकडे-तिकडे शिवसेनेचा बोलबाला आहे. आमच्याविषयी बोलण्यासारखे काही नाही म्हणून काही जण व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत, असेही ते म्हणाले.
