पुरस्कारामुळे मिळते प्रेरणा आणि कामासाठी उर्जा

रावेरात पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी आमदार अरुण पाटील


रावेर : समाजाने दखल घेत दिलेला पुरस्कार हा जीवनात केलेल्या कार्याची पावती असते. अशा पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा तर स्वतःसाठी उर्जा मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. कृषी सेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील श्रीराम मॅक्रो व्हिजन स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील, नागपूरचे राष्ट्रीय कृषी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन गिरोळकर, अनंत बागुल, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उद्योजक डॉ.प्रशांत सरोदे, भाजपा किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, राष्ट्रवादीचे सोपान पाटील, केळी कामगार नेते दिलीप कांबळे, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जळगाव अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी.एस.पाटील, दीपक कापोटे, पंचायत समिती सदस्य जितू पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू सुवर्णे आदी उपस्थित होते.



शेतकर्‍यांचा मान-सन्मानाचा पायंडा कौतुकास्पद
माजी आमदार पाटील म्हणाले की, सर्वच क्षेत्रात मान-सन्मान होत असतात परंतु शेतकर्‍यांचा मान-सन्मान करण्याचा पायंडा ‘कृषीसेवक’ने सुरू ठेवला आहे. कोरोना काळात देशातील सर्व उद्योग बंद पडले असताना केवळ शेती उद्योगाने अर्थचक्र सुरळीत सुरू ठेवले होते. शेतकर्‍यांसमोर असलेल्या अडचणी दूर कारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत तसेच नुकसानीची मदत देताना कमाल क्षेत्राची मर्यादा काढून लागवडीच्या क्षेत्राला मदत द्यावी. शेतकर्‍यांना केंद्र व राज्य सरकारने शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले.

विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
यावेळी खासदार रक्षा खडसे, के.बी.पाटील, गजानन गिरोळकर, उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा असलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती राणे तर प्रास्ताविक कृष्णा पाटील यांनी करून आभारही मानले. यावेळी शेतकरी, युवा शेतकरी, शात्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, शेतकरी मित्र, कृषी उद्योजक, व शेतकरी मित्र या गटातून निवड झालेल्या एकूण 35 पुरस्कारार्थींचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !