राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिकांवरील कारवाई चुकीची : पक्ष खंबीरपणे पाठीशी
मुंबई : राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असलीतरी राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली आहे. अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असे पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या या भूमिकेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणार्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्याचे समजते.
मंत्रीपदाचा तातडीने द्यावा राजीनामा : चंद्रकांत पाटील
ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने मलिक आता काय निर्णय घेतात ? हेदेखील लवकरच स्पष्ट करणार आहे.


मनी लाँड्रींगप्रकरणी कारवाई
मुंबईत आणि लगतच्या परीसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली.
