कौटुंबिक वादातून मुलीने केली पित्याची हत्या


इचलकरंजी : कौटुंबिक वादातून मुलीने वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यांची हत्या केली. इचलकरंजीतील केटकाळे मळ्यात ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. या घटनेत शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे (40, रा.बर्गे मळा, इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला. संशयित साक्षी शांतीनाथ केटकाळे (वय 21) व मुलीची आई सुजाता केटकाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कौटुंबिक कारणातून हत्या
चंदूर (ता. हातकणंगले) कडे जाणार्‍या बर्गे मळा परिसरात शांतीनाथ केटकाळे कुटुंबासह राहत असून त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शांतीनाथ केटकाळे यांचा कुटुंबासोबत काही कारणामुळे वाद निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांची मोठी मुलगी साक्षी हिने त्यांच्या टोक्यात लोखंडी गजाने वर्गी घाव घातला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला होता.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
यावेळी घरातून मोठा आरडाओरडा ऐकू येत होता. हे ऐकताच भागातील नागरिक घरात गेले. त्यानंतर तत्काळ केटकाळे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर आयजीएम हॉस्पिटलमध्ये आणले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी व आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !