मुक्ताई यात्रोत्सवाला सुरूवात : दोनशेहून अधिक दिंड्यासह लाखांवर भाविक दाखल
चार दिवस पर्वणी : खाद्यपदार्थांसह उंच पाळणे व भांड्यांची दुकाने थाटली
मुक्ताईनगर : निळा म्हणे जाणोनी संत, येती धावत प्रतिवर्षी, या संक्तोक्तीनुसार वारकरी संप्रदायात संतांच्या वारीस दरवर्षी पायी चालत येण्याची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर भरणारी यंदाची चांगदेव मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा महोत्सवात शनिवारी रात्री उशिरापर्यंत दिंड्यासह भाविकांचा ओघ सुरू होता. मुक्ताबाई जयघोषात वारकरी पावले टाकीत तल्लीन होऊन भजन गात होते. कित्येक दिवसानंतर शहरात टाळ मृदंगाचा गजर दुमदूमला. शहरवासीयांनी वारकर्यांचे चहापाणी देत स्वागत केले. दोनशेहून अधिक दिंड्यातून लाखांवर भाविक वारीत दाखल झाले आहेत. रात्री संत सखाराम महाराज ईलोरेकर दिंडी परंपरेचे गादीपती हभप विश्वंभर महाराज यांचे कीर्तन झाले.
वारकरी दिंड्या नगरप्रदक्षिणा घालणार
रविवारी माघ वद्य एकादशी वारी निमित्ताने संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुळमंदिरात संस्थानचे विश्वस्त मानकरी भैय्यासाहेब रवींद्र पाटील व सम्राट पाटील यांच्याहस्ते महापूजा अभिषेक करण्यात येईल. एकादशीनिमित्त वारकरी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतील. प्रत्येक फडावर कीर्तन भजन, अखंड हरिनाम चालू राहील. जुन्या कोथळी परीसरात व्यावसायीकांनी आपली दुकाने थाटली असून ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाले आहेत. यात्रेत दराबा, शिंगाडा शेव, वेफर्स, आदी पदार्थांंचे मुक्ताई प्रसाद म्हणून विशेष आकर्षण आहे.
तांबा-पितळी भांडी महागली
संत चांगदेव मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच होत आहे. यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर भांडी विक्रीची दुकाने थाटण्यात येतात. मोठ-मोठ्या समारंभाला लागणार्या भांड्यापासून घरगुती वस्तूपर्यंतची अॅल्युमिनियम स्टील, तांबा-पितळाच्या भांड्यांची विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम, अकोला बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातून लोक भांडी खरेदीसाठी येत असतात. लहान-मोठी 25 दुकाने यात्रेत दाखल झाली आहे तर 2019 यात्रेच्या तुलनेत यावर्षी तांब्या-पितळाच्या भांडी दरात 30 ते 50 टक्के वाढ झाली असल्याची माहिती तीन पिढ्यांपासून यात्रेत सेवा देणारे छगन तोताराम कासार पेढीचे प्रफुल्लसेठ कासार यांनी दिली. 2019 साली तांबे दर 600 ते 900, पितळ 800-1100 व स्टील 400 रुपये होते तसेच 2022 मध्ये तांबे 1000-1700, पितळ 900-1100 तर स्टील 550-600 किलो आहेत. एकंदरीत 30-50 टक्के भाववाढ झाली आहे.
तांब्यासह पितळाची भांडी आजही फायदेशीर
अॅल्युमिनियम स्टीलपेक्षा कासे, तांबा व पितळी भांडी आरोग्यास अधिक चांगली असल्याने व वापरून मोड दिल्यास परतावा सुध्दा मिळत असल्याने ही भांडी खरेदीकडे जास्त कल ग्राहकांचा असल्याचे पप्पूसेठ कासार (यावल) यांनी सांगितले.
यात्रा होणार की नाही याबाबत साशंकता असल्याने कमी वेळेत मालाची जमवा-जमव करावी लागली तरीदेखील यात्रा होत असल्याचा आनंद आहे.


