पंतप्रधानांसमोरच राज्यपालांचे नाव न घेता अजित पवारांनी या शब्दात केली टिका
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या स्पष्ट वक्तपणामुळे ओळखले जातात. अलिकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांविषयी काढलेल्या वक्तव्यानंतर टिकेची वादंग उठले असतानाच अजितदादांनी रविवारी थेट पंतप्रधानांसमोरच राज्यपालांचे नाव न घेता टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणार्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष वेधतो. महान लोकांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणाबद्दल आकस, आसूया न ठेवता महापुरूषांविषयी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा टोला त्यांनी राज्यपालांचे (bhagat singh koshyari) नाव न घेता लगावल्याने खळबळ उडाली.
पुणेकरांच्या सहनशक्तीला सलाम
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पुणेकरांच्या सहनशक्तीला सलाम करावे लागेल. 12 वर्षांनंतर आज प्रत्यक्षात पुणेकरांची मेट्रो अवतरत आहे. स्वारगेट ते कात्रज, निगडी ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी, रामवाडी ते वाघोली, खराडी ते हडपसर आणि हडपसर ते स्वारगेट अशा मेट्रो प्रकल्पाचा अहवाल तयार करायचे काम सुरू आहे. या विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता मदत करावी, असे ते म्हणाले. पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले असून कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली असता अजित पवारांनी (Ajit Pawar) भरसभेत राज्यपालांचे नाव न घेता लगावलेला टोला सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


