यावलमधील विद्युत पंप चोरी प्रकरणी दोन संशयीतांना अटक
यावल : कालव्यालगत असलेल्या शेतातील दोन शेतकर्यांच्या शेत विहिरीतुन विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. संशयीतांना न्यायालयाने 9 मार्चपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. देवा मांगु भील (साकळी) व ज्ञानेश्वर हरी भील (साने गुरूजी शाळा परीसर, यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
शहरातील सतीष सुपडू यावलकर यांच्या जुना भालशीव रोडवर शेत गट क्र. 1470 व लगतच असलेल्या गोपाळ कोळी यांच्या शेतगट क्रमांक 1482 या दोन्ही शेतातील विहिरीमधुन एक दहा व एक साडेसात अश्वशक्तीचे असे दोन विद्युत पंप (किंमत सुमारे 80 हजार) अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती. दरम्यान, दोघा संशयीतांना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी येथील न्यायालयात न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर त्यांना 9 मार्चपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार बालक बार्हे करीत आहेत.


