मुक्तळ ग्रामपंचायत सदस्य हत्येतील सर्वच आरोपींना अटक करावी

आदिवासी पारधी महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे यांची पत्रपरीषदेत मागणी : निपक्षपणे तपासाची अपेक्षा


बोदवड : बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी (28) यांची शनिवार रोजी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून घडलेली घटना म्हणजे पारधी समाजावरील अन्याय आहे. या संदर्भात मंगळवारी बोदवड शासकीय विश्रामगृहात आदिवासी पारधी महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे यांनी पत्रकार परीषद घेवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला
मुक्तळचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी यांना राजकीय असुयेपोटी व अनैतिक संबंध दाखवून महिलेने रात्रीच्या वेळी बोलावले व घरातील सर्व सदस्यांनी बेदम मारहाण करून शिवाजी पारधी यांची हत्या केली व पुरावे नष्ट होण्यासाठी मृतदेह बोदवड-मलकापूर रस्त्यावरील पुलाखाली फेकून दिला. पोलिसांनी केवळ नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आणखी काही आरोपी मोकाट असल्याचा आरोप सोनवणे यांनी यावेळी केला. सर्व आरोपींचा पोलिस प्रशासनाने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी करीत आरोपींच्या घरांना संरक्षण असताना पारधी वस्तींना का संरक्षण नाही? असा प्रश्न उपस्थित करीत तपास अधिकारी बदलावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यांची होती उपस्थिती
आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने बोदवडचे तहसीलदार योगेश्वर टोंम्पे व बोदवड चे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले .यावेळी संघटनेचे प्रल्हाद सोनवणे, विष्णू सोनवणे, तालुकाध्यक्ष समाधान पारधी, राज्य सचिव जितेंद्र पारधी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण पारधी, ज्ञानेश्वर पारधी, मधुकर पारधी, सुरेश पारधी, नितीन पारधी, जयसिंग पारधी, आशाबाई पारधी, सोनाबाई पारधी, शारदाबाई पारधी, मंगलाबाई पारधी, कल्पना पारधी, रुख्माबाई पारधी, रंजनाबाई पारधी व शिवाजी पारधी यांच्या घरातील सर्व सदस्य या पत्रकार परीषदेला उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !