पदोन्नतीचा आनंद ठरला औट घटकेचा : लाच प्रकरणात फौजदार एसीबीच्या जाळ्यात
Acb Trap बीड : फौजदाराची सहाय्यक निरीक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता मात्र हा आनंद काही क्षणासाठीच टिकला कारण लाच प्रकरणात (डिमांड) फौजदाराचे नाव समोर आल्याने त्यास एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. अफरोज तैमूरखॉ पठाण (36) (Afroz Taimurkho Pathan (36) असे अटकेतील फौजदाराचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत.
दुपारपर्यंत शुभेच्छांचा झाला वर्षाव
राज्यातील उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी महसूल विभागाचे वाटप करुन पसंती क्रमांक मागविलेले आहेत. याची यादी 9 मार्च रोजी अपर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली. या यादीत अफरोज पठाण यांचेही नाव आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ते पदोन्नतीचे सत्कार स्वीकारत होते. 11 मार्च रोजी त्यांच्या मित्रपरिवाराने सत्कार करुन पेढा भरविला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकले.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
सगळीकडून स्वागताचा, अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण सायंकाळी एसीबीच्या बीड येथील पथकाने त्यांना लाच मागणी केली म्हणून अटक केली. एका तक्रारदारावर जबरी लुटीचा गुन्हा होता, तपासात त्यास सहकार्य करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर 40 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी लाच स्वीकारली नाही. अखेर एसीबीने त्यांना लाचमागणीच्या आरोपाखाली अटक केली. उपअधीक्षक शंकर शिंदे, हवालदार सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी आदींनी ही कारवाई केली.
