सावद्यातील नवीन हद्दवाढ झालेल्या भागातील ‘पाणीपट्टी’ अखेर झाली कमी
माजी नगरसेवक फिरोज खान यांच्या लढ्यास यश
सावदा : शहरातील नवीन हद्दवाढ झालेल्या भागात शहरापेक्षा दुपटीची म्हणजे 2900 रुपये पाणीपट्टी 2019 पासून आकारली जात होती. वाढीव पाणीपट्टी कमी हेाण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून माजी नगरसेवक फिरोजखान पठाण यांचा पाठपुरावा सुरू होता तर याबाबत माध्यमांनी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या लढ्याला यश आले असून प्रशासनाने पाणीपट्टी कमी केल्याने या भागातील नगरसेवकांनी माध्यमांचे आभार मानले आहेत.
माजी नगरसेवकांनी वेधले लक्ष
सोमवार, 14 रोजी देखील माजी नगरसेवक फिरोजखान स्वतः व हद्दवाढ झालेल्या भागातील नागरीक नगरपालिकेत हीच मागणी घेवून दाखल झाले. यावेळी त्यांना मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी प्रशासक व प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी वाढीव पाणीपट्टीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगून सन 2021 पासूनची पाणीपट्टी शहराप्रमाणेच म्हणजे 1400 रुपये आकारण्यात येत असल्याचे सांगून यापुढेही हीच पाणपट्टी आकारली जाईल, अशी ग्वाही दिली दरम्यान, ज्यांनी यापूर्वी 2900 रुपये पाणीपट्टी भरली असेल त्यांची वाढीव रक्कम पुढील वर्षाच्या पाणीपट्टीत जमा करण्यात येईल, असेही उपस्थिताना सांगण्यात आले. माजी नगरसेवक फिरोजखान पठाण यांच्या लढ्यास खर्या अर्थाने अखेर यश आले आहे.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, नवीन हद्दवाढ झालेल्या भागातील नागरीक उपस्थित होते. माजी नगरसेवक फिरोजखान व राजेंद्र चौधरी यांनी प्रशासक तथा प्रांतअधिकारी कैलास कडलग व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे आभार मानले.


