भुसावळातून चक्क चोरट्यांनी शेळ्या लांबवल्या
भुसावळ- शहरात चोरी-घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या असताना आता भुरट्या चोर्याही होवू लागल्याने नागरीक धास्तावले आहेत. भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा आता पशुधनाकडे वळवला आहे. शहरातील जूना सतारे भागातील गवळी भागातून चोरट्यांनी आठ शेळ्या लांबवल्याने पशूपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शेळी मालकाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना सतार्यातून शेळ्या लांबवल्या
जुना सतारे भागातील गवळीवाडा भागातील रहिवासी शेख शफी शेख इसाक यांच्या मालकीचा एक बोकड व सात शेळ्या आपल्या घराजवळीलच पत्री शेडमध्ये रविवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बांधून दरवाज्याला कुलूप लावले मात्र चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाज्याचे कुलूप तोडून पत्री शेडमधील एक बोकडसह सात शेळ्या लांबवल्या. हा प्रकार सकाळी शेख शफी यांच्या लक्षात आला.भरवस्तीमधून शेळ्या चोरीला गेल्याने परीसरातील रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. शेख शफी यांनी शहर पोलीस ठाणे गाठून शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी एकूण 32 हजारांचे पशूधन लांबवले असून तपास सहाय्यक फौजदार युनुस तडवी करीत आहेत.



