गटविकास अधिकार्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
बोडवड : तालुक्यातील साळसिंगी येथील रहिवासी विलास कडू सुशीर यांनी ग्रामसेवक व प्रशासक यांनी वारस नोंदणीचा उतारा न दिल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी 4 नोव्हेंबरपासून बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसर्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्या पत्रानुसार ग्रामपंचायत घर क्रमांक 327 कडू सोनू सुशीर यांच्या मिळकतीबाबत सर्व कागदपत्राची पूर्तता व पडताळणी करून वारसांची नोंद करण्यास हरकत नाही तसेच वारस नोंदी घेण्याबाबत योग्य कारवाई ग्रामपंचायतीने करून घ्यावी व तसा अहवाल कार्यालयाला सादर करावा, असे पत्र दिल्याचे उपोषणकर्त्यांना सांगून प्रशासक व ग्रामसेवक घर नंबर 327 च्या नोंदीबाबत योग्य ती कारवाई करून पंचायत समिती कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले तसेच प्रशासक व ग्रामसेवक यांनी कुठल्या आधारे वारसांच्या नोंदी बदल केलेल्या आहेत याबाबत संबंधितांकडून लेखी खुलासा मागवावा, असे सांगितले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील 11 मार्च 2019 च्या पत्रानुसार 327 ला ज्या नोंदी होत्या त्या पूर्ववत होण्याच्या कार्यवाही प्रस्तावित होत असल्याचे लेखी पत्र विलास सुशीर यांना दिल्यानंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्या उपस्थितीत उपोषण सोडवण्यात आले.
