भुसावळातील अडीच लाखांच्या चोरीचा उलगडा : आरोपी जाळ्यात
रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची दुसर्यांदा दमदार कामगिरी : काझी पेठ एक्सप्रेसमध्ये झाली होती चोरी
भुसावळ : अप काझी पेट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या अडीच लाखांच्या चोरीनंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची यंत्रणा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना मंगळवार, 12 रोजी एक संशयीत सुरक्षा यंत्रणेला पाहताच पळू लागल्यानंतर यंत्रणेचा संशय बळावल्याने संशयीताच्या मुसक्या आवळताच त्याने काझी पेठ एक्स्प्रेसमध्ये चोरी केलेला मुद्देमाल काढून आला. आठवडाभरात दोघा सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करीत दोन मोठ्या चोर्या उघडकीस आणल्याने यंत्रणेचे कौतुक होत आहे. नागसेन महादेवराव खंडारे (वय 30, रा. कमला नगर, बिल्डींग नंबर 54, वाशीम बायपास, अकोला) या अटकेतील आरोपीच्या ताब्यातून एक लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अडीच लाखांच्या चोरीने उडाली खळबळ
अप काझीपेट एक्स्प्रेसच्या एस-2 या डब्यातील 49 क्रमांकाच्या सीटवरून प्रीयता रूपेश उमाप (रा.सदाशीव अपार्टमेंट, सखा प्लॉझा, कोथरूड, पुणे) या प्रवास करीत असतांना त्याची बॅग कोणी तरी चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात 4 नोव्हेबरला रात्री 11.44 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. उमाप यांच्या बॅगेत सोन्याचे दागिणे होते. यात मंगळसूत्र, सोन्याच्या रींग, गळ्यातील चेन, सोन्याचे कानातील रींग, चांदीचे पायल, चांदीचा शिक्का, सोन्याचे लॉकेट असा एकुण 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे होते. सुमारे दोन लाख 40 हजार रुपये चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील संशयीतांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना लोहमार्ग निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी दिल्यात. यामुळे रेल्वे स्थानकावरील संशयीतावर पोलिस लक्ष ठेऊन होते. याप्रकरणी आरपीएफ जवानांना सुध्दा चोरीच्या घटनेबाबत माहिती देण्यात आली होती.



संशयीत अडकला अखेर जाळ्यात
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म सहावरून पाठीवर एक सॅक बॅग लावून एक युवक जात असताना गस्तीवरील आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी त्यास आवाज देत बोलावले मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत पळ काढला. यावेळी संशयीत रेल्वे रूळात पडल्यानंतर पाठलाग करणार्या यंत्रणांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई आरपीएअचे एएसआय रोशन खान, मुकूंद जगताप. प्रल्हाद सिंग, कॉन्स्टेबल विनोद रावल, कॉन्स्टेबल सिंधू सिंग, कॉन्स्टेबल महेंद्र बाबू, गवई, तसेच लोहमार्गचे शैलेश पाटील आदींनी केली. यावेळी आरोपी नागसेन महादेवराव खंडारे (वय 30, रा. कमला नगर, बिल्डींग नंबर 54, वाशिम बायपास, अकोला) यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून एक लाख 34 हजार 600 रुपये किंमतीचे दागिने जप्त करून त्यास रात्री अटक करण्यात आली.
