शिंदी शिवारातून मक्यासह गव्हाच्या गोण्या लंपास
भुसावळ : तालुक्यातील शिंदी शिवारातील गणेश राजपूत यांच्या शेतातील शिवारात असलेल्या गोदामात ठेवलेले मक्याच्या 13 गोण्या व गव्हाच्या सहा गोण्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना 17 रोजी रात्री घडली. ही घटना बुधवारी सकाळी सातला वाजता उघडकीस आली. यात चोरट्यांनी सुमारे 20 हजार 500 रूपयांचे धान्य लांबविले. यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेती साहित्याच्या चोर्यांमुळे घबराट
तालुक्यातील शिंदी येथे गणेश राजपूत यांच्या गट क्रमांक 202/ 2/2 शेतातील गोडाऊन मध्ये धान्याच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. कोणी तरी चोरट्यांनी 50 कीलो वजनाच्या 13 गोण्या मक्याच्या तर सहा गोण्या 50 कीलो वजनाच्या गव्हाच्या अश्या सुमारे 20 हजार 500 रूपयांच्या धान्याच्या गोण्या कोणी तरी चोरून नेल्यात. यात 13 हजार रूपयांचा मका होता तर 7 हजार 500 रूपयांचा गहू होता. चोरीची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी गणेश राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सुभान तडवी पुढील तपास करीत आहे.







