पिंपळकोठा येथील कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या
Suicide Of A Debt-Ridden Farmer In Pimpalkotha एरंडोल : सोसायटीचे कर्ज, नातेवाईकांनी काढून दिलेले तसेच इतर हात उसनवारीचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या तालुक्यातील पिंपळकोठा येथील शेतकर्याने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू सुकलाल मराठे या (वय 53) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
कर्ज झाले डोईजड
मराठे कुटुंबासह शेती काम करून चरीतार्थ चालवत होते. शेती करण्यासाठी मुलाने सोसायटीचे काढलेले कर्ज तीन वर्षांपासून भरले नाही. मुलाच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते काही दिवसांपासून राहत होते. सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतकरी राजू मराठे शेतात गेले आणि त्यांनी तेथे झाडास गळफास घेतला. पत्नी सरलाबाई यांनी पुतण्या महेंद्र मराठे यास सांगताच तो दोघांसह शेतात गेला असता तेथे त्यास काकाने आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मराठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा व सून असा परीवार आहे.
