Supreme Court तूर्तास धनुष्यबाण शिवसेनेकडेच : सुप्रीम कोर्टाने दिला हा महत्त्वाचा निर्णय
Turtuas Dhanushya arrow to Shiv Sena: This decision was given after maneuvering in the Supreme Court नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षानंतर सुप्रीम कोर्टात नेमका काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागून असताना गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सेनेला तूर्त दिलासा देत पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, अशी सूचना निवडणूक आयोगाला करण्यात आली त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सत्तासंघर्षाच्या याचिकांवर पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
अपात्रतेकडे लागले राज्याचे लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून कोर्टात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यातील काही 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांकडून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

पक्ष चिन्हाबाबत तूर्तास कोणताही निर्णय नाही
गुरुवारच्या सुनावणीत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचना केल्या आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको. लिखित युक्तिवादांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ. सर्व याचिका सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेऊ. त्याचसोबत निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणखी काही मुदत वाढवून द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत त्यांचे म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
