MP Sanjay Raut खासदार राऊतांच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने सुनावली 8 ऑगस्टपर्यंत कोठडी
MP Raut’s problem increases: Court orders remand till August 8 मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोप केले आहेत.
राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी 15 दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ 4 दिवसांची कोठडी दिल्यामुळे संजय राऊत यांना जामीन मंजूर होऊन दिलासा मिळणार की, कोठडीत वाढ होणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही काळ वाढला आहे. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जी अलिबागमधील जीन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तसेच, 10 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

राजकीय हेतूने राऊतांवर कारवाई
मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलंय तिथं व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवले आहे, असे ईडीच्या अधिकार्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचेही राऊतांचे वकिल मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे.
