तर मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयाला प्रशासनाने लावावे कुलूप

नगरसेवकाच्या इशार्‍याने खळबळ : कामकाजात सुधारण करण्याचा अल्टीमेटम


मुक्ताईनगर :  मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी व इतर काही महत्त्वाच्या विभागीय अधिकारी यांचा कारभार प्रभारी स्वरूपात सुरू असल्याने कार्यालयीन कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार वाढून यातून नागरीकांची प्रचंड हेळसांड होत आहे. सर्वसाधारण किरकोळ दाखल्यांसाठी, परवानग्यांसाठी नागरीकांना महिना-महिना वाट पहावी लागत आहे त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. कार्यालयीन कामकाजात तत्काळ सुधारणा करण्यात यावी अन्यथा नागरीकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या नगरपंचायत कार्यालयाला जिल्हाधिकार्‍यांनीच कुलूप लावावे, अशा तक्रारीचे निवेदन देत नगरसेवक संतोष मराठे यांनी संतप्त नागरिकांच्या सहभागाने दिले असून जन आंदोलन उभारण्याचा इशारा ही दिला आहे.

कर्मचारी रजेवर जाताच खोळंबतात कामे
निवेदनाचा आशय असा की, मुक्ताईनगर येथील नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता हे पद रीक्त असल्याने येथे प्रभारी स्वरूपात कामकाज सुरू आहे तसेच येथील महत्त्वाचे टेबल असलेले कार्यालयीन अधीक्षक ,लेखापाल, कर निरीक्षक हे नियमित कर्मचारी असूनही सदरील कर्मचारी जर आठ-आठ दिवसांसाठी रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागेवरील पदभार दुसर्‍या कुणालाही दिला जात नाही त्यामुळे या सर्व काळात नागरीकांना महत्त्वाच्या कामासाठी लागणार्‍या एनओसी, उतारे, दाखले, जन्म- मृत्यूचे दाखले, महत्वपूर्ण कागदपत्रे, बांधकाम परवानगी आदींसाठी महिना-महिना फिरावे लागते त्यातच येथे प्रभारी राज असल्याने कार्यालयीन कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार वाढला आहे. किरकोळ कारणावरून नागरीकांच्या कामांना हेतू पुरस्कर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तसेच नियमित कर भरणा करणार्‍या नागरीकांनाही आर्थिक मार्च भरणा केला असल्यावरही चालू मार्च भरणा करा, असे सांगून त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप आहे.

तर प्रशासनाने लावावे कुलूप
नगरपंचायत कार्यालयाला स्वतः प्रशासनानेच कुलूप ठोकून मोकळे व्हावे, अशा इशार्‍याचे निवेदन नगरसेवक संतोष मराठे यांनी देत भविष्यात नागरीकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास मोठे जन आंदोलन शिवसेना स्टाईलने उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !