भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उद्योजक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळात आयोजन : खासदार रक्षा खडसे यांनी दिली भेट : लाखो रुपयांची उलाढाल
भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे गेल्या दहा वर्षांपासून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तीन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्याचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. यंदा सुध्दा मेळाव्यात महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री केली. मेळ्याव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व या माध्यमातून प्रमाणावर सामानाची विक्री होवून लाखोंची उलाढाल झाली.
महिलांच्या वस्तूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ
शहरातील ब्राम्हण संघात आयोजीत केलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री तर झालीच परंतु त्याच बरोबर त्यांना त्यांच्याकडील तयार करीत असलेल्या मालाची ऑर्डरही मिळाली. महिलांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार संजय सावकारे, मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे व त्यांच्या संपूर्ण टीम बद्दल समाधान व्यक्त केले. पैसे देऊन सुध्दा असे नियोजन होत नाही, तसे नियोजन प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे निःशुल्क उपलब्ध करून दिले, असे महिलांनी सांगितले. मंडळाच्या या उपक्रमा मुळे आमची दिवाळी ही अतिशय चांगली जाईल असे आवर्जून स्टॉल लावणार्या महिलांनी मनोगतात सांगितले.

खासदारांसह अनेकांची मेळाव्याला भेट
ग्रामीण भागातील महिलांनीदेखील मेळाव्यात सहभाग नोंदविला. यात कुर्हा, साकेगाव, वरणगाव, फुलगाव,फेकरी,कंडारी येथील महिलांनी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. मेळाव्याला खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतूक केले. व महिलांना मार्गदर्शन केले. बियाणी ग्रुपच्या सचिव संगीता बियाणी, ओवी सोमनाथ वाघचौरे, भारत विकास परीषदेच्या माजी अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते, डॉ.संजय नेहते, डॉ.मृणाल पाटील, महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी, पतंजली संस्थेच्या महानंदा पाटील, पिंकेथॉनच्या माधुरी गुर्जर, डॉ.अर्चना खानापूरकर, डॉ.खानापूरकर, रोटरी ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्षा नूतन फलक, सप्तपुटत कलानिकेतनचे प्राचार्य अतुल मालखेडे, कविता कोठारी आदी मान्यवरांनी भेट दिली व महिलांमध्ये असलेल्या कलागुणाचे कौतुक केले.