सातगाव डोंगरीच्या अल्पवयीन तरुणाची आत्महत्या
Suicide of a minor youth of Satgaon Dongri पाचोरा : अल्पवयीन तरुणाने शेतात जात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. ऋषिकेश संतोष आवारे (सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे. ऋषीकेशने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.
शेतात उचलले टोकाचे पाऊल
रविवार, 6 नोव्हेंबर रोजी ऋषीकेश संतोष आवारे याचे आई- वडील आणि मोठा भाऊ कापूस वेचणीच्या कामानिमित्त दुसर्याच्या शेतावर गेलेले होते. ऋषीकेश हा निम्म्या वाट्याने केलेल्या दुसर्याच्या शेतावर शेळ्या आणि बैल चारण्यासाठी गेला होता. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेळ्या घरी आणून बांधून ठेवल्या. नंतर शेतात कोणालाच न सांगता निघून गेला. सात वाजेच्या दरम्यान वडिलांनी गावात व गावातीलच असलेल्या मुलाच्या मामाकडे तपास केला असता तो आढळून आला नाही. वडील संतोष लक्ष्मण आवारे व भाऊ अनिकेत हे दोघे शेतात ऋषीकेशचा शोध घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ऋषीकेश हा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी वडिलांनी व भावाने हंबरडा फोडला.


मृत्यूबाबत संशय
पोलिस पाटील दत्तू पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दूरध्वनी वरून खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ऋषीकेशच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, ऋषीकेशच्या मृतदेहावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल आर.के.पाटील करीत आहे.