भुसावळ शहरातील जाम मोहल्ला मार्गावर अखेर ‘पॅचवर्क’

रीक्षा चालकांच्या आंदोलनाची पालिकेकडून दखल : वाहनधारकांना दिलासा


Finally ‘patchwork’ on Jam Mohalla road in Bhusawal city भुसावळ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जुनी नगरपालिका ते जाम मोहल्ला मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानंतरही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या 70 चालकांनी भीक मांगो आंदोलन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने मंगळवारी रात्री 11 वाजेनंतर या मार्गावर पॅचवर्कचे काम केल्याने वाहन धारकांसह रीक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच या रस्त्याची डागडूजी झाल्यानंतर वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

रीक्षा चालकांनी केले होते आंदोलन
रेल्वे स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष पोलिस चौकीपर्यंतच्या सुमारे 200 मीटर अंतराचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्यानंतर वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता शिवाय दरमहा वाहन दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याने वाहनधारकांमध्ये पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी होती. भुसावळ पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सुभाषचंद्र बोस रीक्षा युनियनच्या 70 चालकांनी भीक मांगो आंदोलन करीत रीक्षा बंद ठेवून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. पालिका प्रशासन जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करीत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली.


रात्रीतून झाले पॅचवर्क
सर्वाधिक वर्दळीच्या या रस्त्यावर मंगळवारी रात्री 11 वाजेनंतर पालिकेच्या कंत्राटदाराने पॅचवर्कचे काम केले आहे. कामामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष पोलिस चौकीपर्यंतच्या सुमारे 200 मीटर अंतरावरील खड्डे बुजवण्यात आल्याने रीक्षा चालकांसह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. कायमस्वरुपी प्रश्न निकाली निघण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण वा काँक्रिटीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !