कुर्हा येथे आर्मीतील जवानासह दोघांना मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा
पत्नीला घेण्यासाठी आलेल्या जवानासह दोघांना बेदम मारहाण
भुसावळ ः माहेरी आलेल्या पत्नीस घेण्यासाठी आलेल्या आर्मीतील जवानासह दोघांना सासरच्यांनी लोखंडी रॉड, विळ्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात आर्मीतील जवान सुनील रमेश धनगर (31, आर्मी कॅम्प दरेवाडी, अहमदनगर, मूळ रा.कळमसरा, ता.पाचोरा) व रमेश साहेबराव धनगर (गिरड, ता.भडगाव) हे जखमी झाले आहेत.
पत्नीने येण्यास नकार देताच मारहाण
सुनील धनगर यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी रमेश धनगर यांच्यासोबत सासरी पत्नीला घेण्यासाठी आल्यानंतर सविता धनगर यांनी सोबत येण्यास नकार दिला व त्यावरून शाब्दीक वाद वाढतच गेल्याने संशयित भैय्या नामदेव धनगर याने विळ्याने हल्ला केला तर देवानंद गोपाळ धनगर, भास्कर धनगर, गोपाळ धनगर (सर्व कुर्हेपानाचे) यांनी लोखंडी रॉड, लोखंडी रूमणे, कुर्हाडीच्या दांड्याने सुनील यांच्यासह रमेश यांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सुनील धनगर यांनी तालुका पोलिसात शनिवारी रात्री पावणेदहा वाजता वरील चारही संशयितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.