भुसावळात आज मरीमातेचा यात्रोत्सव : बारागाड्या ओढण्यात येणार

अप्रिय घटना टाळण्यासाठी काटेकोर नियोजन : बारागाड्यांवर केवळ स्वयंसेवकांनाच मुभा


भुसावळ : शहरात परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराचा यात्रोत्सव होत असून यानिमित्त परंपरेप्रमाणे बारागाड्या ओढण्यात येणार आहे. गतवर्षी घडलेल्या घटनेनंतर अप्रिय घटना टाळण्यासाठी उत्सव समितीने यंदा काटेकोर नियोजन केले असून पोलिस प्रशासनातर्फेदेखील चोख बंदोबस्त राखला जाणार आहे. यंदा बारागाड्यांवर केवळ सतारे भागातील विविध मंडळाचे पदाधिकारी असलेल्या स्वयंसेवक बसणार असून नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांना मंगळवारी टी शर्ट देण्यात आले.

केवळ स्वयंसेवकांना बारागाड्यांवर बसण्याची मुभा
मरीमाता यात्रोत्सवात बारागाड्यांवर अधिक प्रमाणात भाविक बसतात व यामुळे गतवर्षी बारागाड्या अनियंत्रीत होऊन एका भाविकाचा बळी गेल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व उत्सवाचे पावित्र्य कायम राहण्यासाठी मरीमाता मंदिर यात्रोत्सव समितीने यंदा बारागाड्यावर कमी भाविक बसवण्यासह केवळ नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांनाच बारागाड्यांवर बसण्याची परवानगी दिली आहे शिवाय त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांना ‘स्वयंसेवक’ मजकुर प्रिंट केलेला टी शर्ट मंगळवारी देण्यात आला.

बारागाड्यांचे आकर्षण
यात्रोत्सवात मरीमाता मंदिर समितीने नियोजन केले असून मंदिराची सफाई व सजावट केली जाणार आहे. यंदाच्या यात्रोत्सवात भगत देवेंद्र सपकाळे (देवू) हे बारागाड्या ओढतील तर बगल्या म्हणून मयुर भोळे व दुर्गेश पाटील असणार आहे. दरम्यान, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुपारून या भागातील वाहतूक बंद करण्यात येणार असून पोलिस प्रशासनाचा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !