अद्यावत ज्ञानातून विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ व्हा : प्रा.उल्हास फालक

भुसावळातील भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन


भुसावळ : आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारीत आहे. आजचे 21 वे शतक आपण विज्ञान व तंत्रज्ञानाचे मानतो कारण आज आपण आपल्या आजूबाजूला थोडसं जरी डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की विज्ञानामुळे आपली प्रगती खूप जलद गतीने झाली. विज्ञानामुळे झालेले बदल, नवनवीन संकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करावा. आज भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे उल्लेखनीय कार्य म्हणजे आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान सोडून नवविश्वविक्रम केला. समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढी, कटू परंपरा अजूनपर्यंत नांदत होत्या. विज्ञानामुळे नष्ट झाल्या आहेत. ग्रामीण भागात बुद्धिमत्ता असते, तिला योग्य वळण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सूप्त गुणांना, संकल्पनांना जागृत करून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हा, असा आशावाद अमेरिका न्यूयॉर्क न्यू जर्सी येथील प्रा.उल्हास फालक यांनी येथे केले.

दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सायन्स असोसिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रा.डॉ.जी.पी वाघुळदे व प्रा.डॉ.माधुरी पाटील उपस्थित होत्या.

मानव कल्याणासाठी वैज्ञानिकांचे योगदान
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विज्ञान म्हणजे काय ?आपल्या आयुष्यात विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच मानव कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रामध्ये विविध वैज्ञानिकांनी अनमोल योगदान दिल्याचे सांगत कार्याची माहिती दिली. यावेळी 52 विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ.जी.पी.वाघुळदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केल्याचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !