अमृत योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न सुटणार : आमदार संजय सावकारे
भुसावळात यादव समाजाचे सभागृृहाचे भूमिपूजन
भुसावळ : शहरातील शिवदत्त नगरात यादव समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते रविवारी कुदळ मारून करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक सभागृहासाठी आमदार संजय सावकारे यांनी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सभागृहाच्या कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, सारंग पाटील, किरण कोलते, सतीश सपकाळे, अजय नागराणी, शिवमोहनसिंह जरीया, यादव समाजाचे अध्यक्ष राजेश यादव आदी उपस्थित होते.
आमदार म्हणाले ; शहराचा चौफेर विकास
यावेळी बोलताना आमदार सावकारे म्हणाले की, शहराचा मागील काही वर्षात चौफेर विकास झाला असून शहरात वीज, पाणी, रस्ते, स्वास्थ्य, औद्योगिक विकास आणि इतर अनेक समस्या सोडविण्यात आल्या आहे. शहराची विजेची समस्या सोडवली असून अमृत जल योजनेमुळे आगामी काळात भुसावळवासीयांचे पाण्याचे प्रश्न सुटतील तसेच मागील काही दिवसात प्रशासक काळात नगरपालिकेतर्फे भुसावळ शहरातील रस्त्यांचा कायापालट झाला आहे, काही रस्त्यांचे काम बाकी आहे तेदेखील लवकरच पूर्ण होतील. कार्यक्रमात यादव समाजाच्या सभागृहासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून सहकार्याबद्दल माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष बनवारीलाल यादव, सचिव मोहन यादव, लल्लन यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन संदीप यादव यांनी केले आणि सूत्रसंचालन मंगेश यादव यांनी केले.

