भुसावळात गोळीबारानंतर तरुणाचा मृत्यू : पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
Youth dies after firing in Bhusawal : Cremation under police guard भुसावळ : महामार्गावर चारचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवार, 14 एप्रिल रात्री 10 वाजता घडली होती. गोळीबारात जखमी झालेला अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) याचा मुंबईत उपचार सुरू असतांना शनिवारी मृत्यू ओढवला होता. मृत अक्षय या तरुणावर रविवारी भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयितांविरोधात वाढणार खुनाचे कलम
अक्षय सोनवणे व मंगेश कोळे हे अन्य दोघा मित्रांसह शुक्रवार, 14 एप्रिल रात्री चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही. 0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाले होते. यावेळी हल्लेखोर असलेल्या दुचाकीला कट लागल्याने संशयितांनी जाब विचारला व त्यातून वाद वाढून संशयित करण संतोष सपकाळे याने कमरेला लावलेल्या गावठी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश गंभीररीत्या जखमी झाले. अक्षय याची प्रकृती खालावल्याने त्यास मुंबईत उपचारार्थ हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह भुसावळ येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर पोलिसांचा स्मशानभूमीत बंदोबस्त लावला तसेच खडका येथेही गावात पोलिसांना बंदोबस्त होता. आरसीपी प्लॉटूनचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले होते, अशी माहिती तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी करण सपकाळे, संतोष सपकाळे व जीवन सपकाळे (रा.खडका) यांच्याविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे.
