निवडणुकांची सरकारला भीती म्हणूनच निवडणुका लांबणीवर : अजित पवार


Elections postponed due to government’s fear of elections : Ajit Pawar मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी ती सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. शिवसेनेमुळे मुंबई टिकली. हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे मुंबईतील मराठी माणसांचा अभिमान आणि स्वाभिमान कायम राहिला. शिवसेनेचे काम काहींच्या डोळ्यावर आले आणि म्हणूनच काहींना फोडण्याचे राजकारण करण्यात आले. असेच जर सुरू राहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि देशाची घटना अबाधित कशी राहणार, अशी विचारणा अजित पवार यांनी करीत शिंदे सरकारवर टिकेचे बाण चालवले. सरकार निवडणुका यासाठीच घेत नाही कारण त्यांना जनता माहिती आहे काय करणार आहे त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचे ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत म्हणाले.

या प्रकाराला मुख्यमंत्रीच जवाबदार
राज्यातील जनता आपल्यासोबत आहे. एकजूट राहून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. सोनिया गांधी, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. कोरोनाच्या कठीण काळातही आर्थिक शिस्त कधीही मोडली नाही. बहुतांश कामे योग्य पद्धतीने आणि सुरळीत ठेवली. मात्र, आताचे सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही. 31 मार्च रोजी कोट्यवधी रुपयांची बिले थकलेली आहेत. कंत्राटदारांना थांबण्याच्या सूचना केल्या जात आहेत. चेक वठत नाहीत, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री याला जबाबदार नाही का, असा सवाल अजित पवार यांनी केला.

या सरकारची मानसिकता मदतीची नाही
राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशात अनेक शेतकर्‍यांचे पीक, फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मात्र, त्यांना मदत करण्याची मानसिकता या सरकारची दिसत नाही. राज्यातील बळीराजाला आधार देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. महागाई आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यावर सरकार बोलायला तयार नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

धड मराठीही येत नाही
देखो महाराष्ट्र म्हणत जाहिराती केल्या जात आहेत. मराठीतून नीट देता येत नाही का, देखो काय देखो, पाहा आपला महाराष्ट्र असे लिहायचे होते, असा सल्ला देताना आता यांच्याकडे पाहण्याची वेळ आली आहे. राज्यात प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. बेस्टच्या बसेसवर फोटो चिकटवले जात आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत केली जात नाही, अशी टीका करत राज्याची जी अवस्था झाली आहे, त्याला शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार जबाबदार नाही का, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !