अमृत भारत एक्सप्रेसचे भुसावळसह जळगावात जल्लोषात स्वागत
जळगाव (29 एप्रिल 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 28 एप्रिल 2026 रोजी बनारस-पुणे (हडपसर) व अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भुसावळात जल्लोषात स्वागत
बुधवारी भुसावळ स्थानकावर या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, परीक्षीत बर्हाटे, भाजपा पदाधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

जळगावात यांची उपस्थिती
र जळगाव स्थानकावर खासदार स्मिता उदय वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांच्यासह रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य, पत्रकार व माध्यम प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्त स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
ही नवीन सेवा भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी प्रवास सुलभता वाढविणारी ठरणार आहे. या गाड्या खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि नाशिक रोड यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. भारतीय रेल्वेने प्रादेशिक वाहतूक सेवा विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत या दोन गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये बनारस-हडपसर (पुणे) ही गाडी दररोज धावणार असून अयोध्या-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. मध्यप्रदेशमार्गे धावणार्या या गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या गाड्यांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि महाराष्ट्र-उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणार्या नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. थेट रेल्वे संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित व वेळेची बचत करणारा ठरणार असून गाड्या बदलण्याची गरजही कमी होणार आहे, असे रेल्वे विभागाने कळविले आहे.
