शरद पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी यांची नावे आली चर्चेत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतानाच आता पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पवारानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात राजीनामा सत्र
राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहेत. शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीतील सर्वांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला. ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अश्रू अनावर झाले होते. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नवीन समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत कोण सदस्य असतील, याबाबतची नावे शरद पवार यांनी सूचवली आहेत.

नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समिती
नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गठीत करण्यात येणार्या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य नेत्यांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.
यांना मिळू शकते संधी
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.
पार्टीचा अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच करणार काम
अजित पवार म्हणाले की, पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. शरद पवारांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचे काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचे ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेले आहे. साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
