भरधाव लक्झरीने जळगावात दुचाकीस्वार महिलेला उडवले : लक्झरी चालकाविरोधात गुन्हा
जळगाव : पिंप्राळ्यातील दुचाकीस्वार महिलेला भरधाव लझक्रीने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना शहरातील आकाशवाणी चौकात 17 एप्रिल रोजी घडली होती. अपघातात जखमी झालेल्या महिलेने उपचार घेतल्यानंतर रविवार, 7 मे रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने अज्ञात लक्झरी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
उपचारानंतर फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल
छाया योगेश वाणी (47, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) या नोकरदार असून 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी सहा वाजता दुचाकी (एम.एच.19 डी.पी.5556) ने आकाशवाणी चौकातून जात असताना मागून येणारी लक्झरी बस क्रमांक (एम.एच.19 सी.डब्ल्यू 596) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने वाणी या दुचाकीसह रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर अखेर रविवारी दुपारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महेंद्र पाटील करीत आहे.


