मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द : हेलिकॉप्टरमध्ये अचानक आला बिघाड
Malfunction in Chief Minister Eknath Shinde’s helicopter : Satara tour canceled after emergency landing मुंबई : सातारा जिल्ह्यातील मरळी (ता.पाटण) येथे ‘शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवार होणार होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड झाल्याने हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवले
हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदीपान भूमरेदेखील उपस्थित होते. हेलिकॅाप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवण्यात आले. पाटणचे आमदार तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे होमपीच असलेल्या मरळी-दौलतनगर (ता.पाटण) येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या शुभारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ते जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस होता.

‘मोफत महाआरोग्य शिबिर’
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील तरूणांना अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
