भुसावळातील भाईच्या कोर्टकचेरीसाठी खंडणी मागणार्यांची पोलिसांनी फटके देत काढली ‘वरात’
खंडणी प्रकरणात आरोपी वाढणार : दहशत निर्माण करणार्यांना व्यापारीपेठेत फटकारे : आरोपींना आणणार्या पोलिसांवर कारवाईचे संकेत
Police flogged those who demanded ransom for Bhusawal’s court office भुसावळ : शहरातील रवींद्र खरात हत्याकांडातील आरोपी राजा मोघे याने दोन पंटर व भावाच्या माध्यमातून शहरातील दोन व्यापार्यांना धमकावल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत 24 तासाच्या अंतराने दोन आरोपींना जळगावसह भुसावळातून अटक केली. कोर्ट कचेरीच्या कामासाठी पैसे लागत असल्याने खंडणी न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही तसेच दुकानाची तोडफोड करून गोळीबार करण्याची धमकी देण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने व्यापारी धास्तावल्याने शहर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटकेतील आरोपींची वाहनातून पीडीत व्यापार्यांच्या दुकानापर्यंत वरात काढत त्यांना चांगलेच फटकारे देण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपी कोण-कोणकोणत्या मार्गाने व्यापार्यांकडे गेले त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून व्यापार्यांची चौकशीही करण्यात आली.
दोघांना अटक, तिसरा पसार
शहरातील गुजराथी स्वीट मार्टचे कपिल गुजराथी व गोपी मॉलचे संचालक रवीकुमार झामनानी यांच्याकडे मंगळवारी दुपारी 1.20 ते 2 वाजेदरम्यान तोंडाला रूमाल बांधून व डोळ्याला गॉगल लावून आलेल्या संशयित रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) सह अन्य एका अनोळखीने संशयित सोनू मोघे व राजा मोघे यांच्याशी फोनवर बोलणे करून देत अनुक्रमे 10 व 20 हजारांची खंडणी मागितली होती. भेदरलेल्या व्यापार्यांनी या प्रकरणी शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने सोनू मोघेच्या जळगावातून तर शहर पोलिसांनी रीतीक निदाणेच्या राहत्या घरातून मुसक्या बांधल्या होत्या. या गुन्ह्यातील एक संशयित नाशिक कारागृहात असून दुसरा पसार असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
व्यापारीपेठेत आरोपींना पोलिसांकडून फटकारे
व्यापार्यांकडे खंडणी मागताना आरोपींनी पैसे न मिळाल्यास गोळीबार करण्याची तसेच दुकानाची तोडफोड करण्याची धमकीही दिली होती. या प्रकाराने शहरातील व्यापारीवर्ग प्रचंड भीतीच्या सावटाखाली असल्याने अटकेतील दोघा आरोपींना शहर पोलिसांनी वाहनातून जेथे-जेथे गुन्हा केला तेथे नेले तसेच वाहन जेथे लावले त्या भागात नेत तेथील सीसीटीव्ही तपासून आरोपींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांनी यावेळी दोघा आरोपींना आलटून पालटून चांगलेच फटकारे दिले. पोलिसांच्या या कृतीचे व्यापारीवर्गातून स्वागतही झाले. यावेळी नागरीकांनी गर्दी केली असलीतरी कुणालाही फोटो व व्हिडिओ काढू देण्यात आला नाही. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, एएसआय संजय पाटील, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, विकास बाविस्कर, मोहन पाटील, मेहबूब खान आदींनी आरोपींना शहरातील गुन्हा दाखल केलेल्या भागात शुक्रवारी दुपारी नेले.
संशयितांना भुसावळात न आणण्याबाबत पत्र देणार
पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपींना नाशिक व जळगावातून भुसावळात आणण्यात पोलीस यंत्रणेचा वेळ व पैसा खर्च होतो शिवाय खंडणी प्रकरणाने कायदा-सुव्यवस्थादेखील धोक्यात आल्याने यापुढे हत्याकांडाचा खटला ट्रायलपर्यंत येत नाही तो पर्यंत संशयितांची व्हीसीद्वारे साक्ष नोंदवण्याबाबत पोलीस प्रशासन भुसावळ न्यायालयाला पत्र देणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
राजा मोघेला अटक होणार : आरोपीही वाढणार
खंडणी प्रकरणाचा मास्टर माईंड राजा मोघेला शहर व बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे अटकेतील दोघा आरोपींना आणल्यानंतर दोन तास त्यांची धुलाई करण्यात आल्यानंतर त्यांनी घटनेचा क्रम उलगडून सांगत गुन्ह्याची कबुली दिली तर या गुन्ह्यामागे मास्टरमाईंड राजा मोघेच असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे मोबाईला आलाच कसा शिवाय कुणी आणून दिला? या बाबींकडे आता पोलीस उपअधीक्षकांनी लक्ष वेधले आहे. या गुन्ह्यात लवकरच आठ ते दहा आरोपींची संख्या वाढणार असून लवकरच त्यांना अटक होणार वाघचौरे यांनी सांगितले.
खंडणीखोराची दुचाकी व मोबाईल जप्त
खंडणी प्रकरणातील आरोपी रीतीकच्या घरातून शुक्रवारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण, सहायक निरीक्षक निलेश गायकवाड व पोलीस कर्मचार्यांनी घर झडती घेतल्यानंतर गुन्हा करताना घातलेले कपडे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल जप्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
