विविध मागण्यांसाठी सरपंच परीषदेचा उद्या मंत्रालयावर मोर्चा

सुषमा देसले-पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन


अमळनेर : महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून यासाठी सोमवार. 22 मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच परीषद मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सुषमा देसले यांनी केले आहे.

मोर्चात सहभागाचे आवाहन
ग्रामविकासाच्या अडचणी लक्षात घेऊन सरपंच परीषद, मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच यांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास मोफत करावा, विधानपरीषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, सरपंचांना दरमहा सरसकट दहा हजार रुपये व उपसरपंच यांना तीन हजार रुपये तसेच सदस्यांनाही मानधन सुरू करावे यासह इतर अन्य मागण्यासाठी सोमवार, 22 मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी तसेच शासन व प्रशासन यांनी लोकप्रियतेसाठी शहराच्या उदात्तीकरणाला नेहमी प्राधान्य दिले आहे त्यामुळे ग्रामविकासाला खीळ बसली आहे. राज्यातील सरपंच यांच्या अनेक समस्या तसेच ग्रामपंचायतीचे प्रश्न त्याचप्रमाणे ग्रामविकासाच्या असंख्य अडीअडचणी असून याबाबतीतही धोरणात्मक बदल झाला नाही त्यामुळे सदर मागण्यांसाठी अखेर सरपंचांनाच रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड दम सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत देण्यात आला. या मोर्चासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुषमा देसले-पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !