शेंदुर्णीत युवकावर चाकू हल्ला : दोघांना पोलिसांकडून अटक
Knife attack on youth in Shendurni : Two arrested by police शेंदुर्णी : अतिक्रमण केल्याच्या तक्रारी केल्यानंत संबंधिताना नोटीसा आल्याच्या रागातून शहरातील 23 वर्षीय तरुणावर सहा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पारस मंगल कार्यालयाजवळ घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी सहा संशयितांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल होताच दोन आरोपींना अटक करण्यात आली.
अशी आहे नेमकी घटना
शेंदुर्णी येथील अक्षय वसंत गुजर (23) या तरुणाच्या घराजवळ संशयित आरोपीने अतिक्रमण केल्याने त्याबाबतची तक्रार अक्षयने केल्यानंतर संबंधिताना अतिक्रमणाबाबत नोटीसा प्राप्त झाल्या होत्या शिवाय घराचा दरवाजा संशयित आरोपीच्या घराच्या दिशेने काढण्यात आल्याचा राग मनात ठेवून दत्तनगरातील जीममधून तरुण घराकडे निघाला असता सोमवारी रात्री आठ वाजता पारस मंगल कार्यालयाजवळ आरोपींनी रस्ता अडवत त्याच्यावर चाकू व रॉडने हल्ला चढवला. यात तरुणाच्या पोटावर, पाठीवर व दोन्ही हातावर दुखापत करण्यात आली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. अत्यवस्थ अवस्थेत अक्षयला जळगावच्या क्रिटीकल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अक्षयची आई वंदना अक्षय गुजर (45, शेंदुर्णी) यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयित दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, राजू भिला गुजर, सचिन अनिल धनगर (सर्व रा.शेंदुर्णी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लखन व राजू गुजर यांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.


