चोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त
शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून बेड्या
One lakh stock of fake seeds seized in Chopra city चोपडा : रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (35, रा.वर्डी, ता.चोपडा) यांनी बोगस बियाण्यांचा साठा विक्रीला आणल्यानी गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत सुमारे एक लाखांचे बियाणे जप्त केली. बुधवार, 24 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. स्वदेशी- 5 कापूस बनावट बियाणांची 95 पाकिटे जप्त करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा-धरणगाव रस्त्यावरील हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली असता संदीप पाटील हा त्याचे वाहन नादुरुस्त झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी- 5 संकर देशी कापूस बियाणे असलेली 99 हजार 750 रु. किमतीची 95 सीलबंद पाकिटे आढळल्याने ती जप्त करण्यात आली. अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात शासन व शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वर्डी येथून त्यास अटक करण्यात आली. बोगस बियाणांच्या रॅकेटचा लवकरचा पर्दाफाश होईल, असा विश्वास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांनी व्यक्त केला.


