चाळीसगावात बंदोबस्तात हटले 50 दुकानांचे अतिक्रमण


Encroachment of 50 shops was removed in Chalisgaon चाळीसगाव : बसस्थानकाच्या भिंतीला लागून असलेया 50 दुकानांचे अतिक्रमण बुधवारी प्रचंड बंदोबस्तात हटवण्यात आले. या मोहिमेमुळे व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांवर पुन्हा बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून बसस्थानकाने काहीसा मोकळा श्वास घेतला असून दोन दिवसात नागद रोड व घाटरोड येथील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली जाणार असल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी दिली.

टप्प्याटप्प्याने सर्वच ठिकाणी निघणार अतिक्रमण
चाळीसगाव शहरात अतिक्रमणाचा मुद्दा अनेक दिवसापासून ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागातील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्याची मोहिम हाती घेतली आहे.आतापर्यंत धुळे, रोड, स्टेशन रोड व सिग्नल चौक ते नारायणवाडी परिसरातील अशा एकून 500 अतिक्रमीत टपर्‍या, दुकाने हटविण्यात आल्या आहेत.

पोलीस बंदोबस्तात कारवाई
बस स्थानकाच्या भितींलगत बेसुमार अतिक्रमण झाले होते. बसस्थानकाच्या चोहोबाजूने अतिक्रमण झाल्याने येथील 50 ते 60 टपर्‍या व दुकाने हटविण्याबाबत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचां अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी पालिकेच्या पथकाने तेथे धडक देत पोलिस बंदोबस्तात मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू केली. यावेळी पोलीस निरिक्षक संदीप पाटील, शहर वाहतूक शाखेचे तुषार देवरे यांच्यासह पालिकेचे बांधकाम अभियंता प्रदीप धनके, दिनेश जाधव, प्रेमसिंग राजपूत, सुमित सोनवणे, मुकादम किरण मोरे, अमन नकवाल,अमित सोनवणे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन, न्यायालयाकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग
बसस्थानकाच्या पाठीमागे ग्रामीण पोलिस स्टेशन, मोठे हॉस्पीटल्स आहे तसेच रेल्वे स्टेशन व न्यायालयाकडे जाण्यासाठी हा महत्वाचा व नागरीकांचा सोयीचा मार्ग आहे. या रस्त्यावरचे अतिक्रमण निघाले असले तरी पुढील काळात येथे अतिक्रमण होवू न देण्यासाठी तसेच येथील गटार मोकळी करून परीसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोजना करणे गरजेचे असणार आहे.

दोन दिवसात नागद रोडवर कारवाई
स्टेशनरोड पासुन ते बाजार समिती तसेच नागद रोडवरील देखील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. यामुळे येथील दुकानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून नागदरोड भागातील अतिक्रमणावरही दोन दिवसात जेसीबी चालवण्यात येणार असल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी दिली.


कॉपी करू नका.