मुलाचे यश पाहण्यापूर्वीच हिरावले पित्याला : भारूडखेड्यातील प्रौढाचा अपघाती मृत्यू
Father lost before seeing his son’s success: Accidental death of an adult in Bharudkheda जामनेर : नियंत्रण सुटलेली चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघात आनंदा भीमराव जगताप (रा.भारुडखेडा, ता.जामनेर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात जामनेर-वाकडी रस्त्यावरील शहापूरजवळ गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता घडला. विशेष म्हणजे गुरुवारी आनंदा जगताप यांचा मुलगा गणेश जगताप याचा बारावीचा निकाल होता व तो शाळेतून प्रथमदेखील आला मात्र मुलाचे यश पाहण्यापूर्वी क्रुर काळाने त्यांच्यावर घाला घातला.
एकाचा मृत्यू तर चालक जखमी
जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथील आनंदा जगताप हे बुधवारी मित्र दिपक शेळके यांच्यासोबत मॅजिक या चारचाकीने कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. काम आटोपून घराकडे परतत असतांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील जामनेर वाकडी रस्त्यावर चारचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने चारचाकी ही रस्त्यालगत झाडावर आदळली. त्यात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक दीपक शेळके हे गंभीर जखमी झाले या अपघाताबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक रामदास कुंभार हे करीत आहेत.
वडिलांनाच खांदा देण्याची मुलावर वेळ
गणेश जगताप हा भारुखेडा येथील राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी असून गुरुवारी त्याला 83.50 टक्के गुण मिळाले. तो शाळेतून तसेच तालुक्यातून कला विभागातून पहिल्या तीनमध्ये उत्तीर्ण झाला. मुलगा गणेश याचे यश बघण्याआधीच अपघातात वडीलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त झाली.


